प्रेमाचा जांगडगुत्ता गं (Premacha Jangadgutta Marathi Poem) – नारायण पूरी

कवी नारायण पुरी यांच्या प्रेमाचा जांगडगुत्ता गं, जीव झाला हा खलबत्ता गं (Premacha Jangadgutta Marathi Poem) या कवितेत प्रेमातील विसंगती आणि संघर्षाचे विनोदी, पण मार्मिक चित्रण केले आहे. कवी प्रियकर-प्रेयसीच्या स्वभाव, आवडी-निवडी, आणि जीवनशैलीतील भिन्नतेची तुलना करतो. एकजण सुसंस्कृत, समृद्ध, आणि कोमल आहे, तर दुसरा साधा, विस्कळीत, आणि संघर्षमय आहे. जीवनाच्या विविध पैलूंमध्ये – अन्न, संगीत, वाहन, राजकारण – त्यांचे मतभेद ठळकपणे दिसतात. कविता समाजातील विषमता आणि राजकीय संदर्भही देऊन प्रेमातील गोड कटुतेवर प्रकाश टाकते. या विसंगतींमुळे प्रेम एक गुंता असला तरी त्याला एक अनोखी रंगत असते.

प्रेमाचा जांगडगुत्ता

प्रेमाचा जांगडगुत्ता गं,
जीव झाला हा खलबत्ता गं
प्रेमाचा जांगडगुत्ता गं…
जीव झाला हा खलबत्ता गं…
उखळात खुपसले तोंड प्रिये…
मुसळाचा तुंबळ रट्टा गं…!

तू लाजाळू परी कोमल गं…
मी निवडुंगाचे झुडूप प्रिये…
तू तुळशीवाणी सत्त्वशील…
मी आग्याबोंड वेताळ प्रिये…
तू विडा रंगीला ताराचा…
मी रसवंतीचा चोथा गं…
प्रेमाचा जांगडगुत्ता गं…
जीव झाला हा खलबत्ता गं…

तू सुप चायनीज चटकदार…
मी झेड-पीची सुकडी खिचडी…
तू बटर नान तंदूर गरम…
मी हायब्रीड भाकर धांदाडी…
तू पनीर कोपता काजुकरी…
मी हिरव्या मिर्चीचा ठेचा गं…
प्रेमाचा जांगडगुत्ता गं…
जीव झाला हा खलबत्ता गं…

तू वीणा हरीच्या हाताचा…
मी तुन तुन तार तूनतूण्याची
तू मधुर सूर पकवाज्याचा…
मी कड कड घाई हलगीची…
तू आषाढवारी अभंग गं…
मी परमिटरूमचा गुत्था गं…
प्रेमाचा जांगडगुत्ता गं…
जीव झाला हा खलबत्ता गं…

तू चपळ नागीन सळसळती…
मी मांडूळाची चाल प्रिये…
बुलेट ट्रेनने फिरसील तू…
मी लोकलने बेहाल प्रिये…
तू समृद्धी हायवे चौपदरी…
मी खड्ड्यातून रस्ता गं…
प्रेमाचा जांगडगुत्ता गं…
जीव झाला हा खलबत्ता गं…

तू मनसेचे ऐलान प्रिये…
मी सावध धनुष्यबाण प्रिये..
ही वेळ हातावर आलेली…
तू कमळापरी बेभान प्रिये…
तू सत्ताधारी माजोरी…
मी हताशलेली जनता गं…
प्रेमाचा जांगडगुत्ता गं…
जीव झाला हा खलबत्ता गं…

तू नकाशात अन्‌ यादीतही…
अन्‌ माझा मतदार केंद्रातून गायब पत्ता गं…
तू अच्छे दिनचा आभास प्रिये…
मी शेतकरी आत्महत्येचा फास प्रिये…
तू विदेशवाऱ्या हॉलिडेज…
माझी जगण्याची भ्रांत प्रिये…
प्रेमाचा जांगडगुत्ता गं…
जीव झाला हा खलबत्ता गं…

तू मुसोलिनी, हिटलरवादी…
मी देशाचा आंदोलनातील फुटका माथा गं..
तू नामांतर, तू विषयांतर…
मी दंगलीमध्ये होतो अमर…
मी पानसरे! मी दाभोळकर!…
तू स्वातंत्र्याचा नुसता बोभाटा गं…
प्रेमाचा जांगडगुत्ता गं…
जीव झाला हा खलबत्ता गं…
उखळात खुपसले तोंड प्रिये…
मुसळाचा तुंबळ रट्टा गं…!

जांगडगुत्ता (श्लेष अलंकार): गोंधळ
अग्याबोंड: रानात आठलणारे एक काटेरी फळ
मांडूळ: सापाची एक प्रजाती
विडा रंगीला ताराचा: छ. संभाजी नगर येथील प्रसिद्ध तारा पान

या कवितेचे मूळ लेखक

या ब्लॉगवर प्रकाशित झालेल्या कविता सोशल मीडिया, पुस्तके, वेब पोर्टल्स, प्रिंट मीडिया इत्यादी विविध स्रोतांमधून संग्रहित केल्या आहेत. या कवितांचे सर्व श्रेय त्यांच्या मूळ लेखकांना जाते. आम्ही लेखकाचे नाव आणि कवितेचा स्रोत यांसह योग्य माहितीसह संपूर्ण श्रेय प्रदान करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो.

या ब्लॉगवर प्रकाशित झालेल्या कोणत्याही कवितेचे तुम्ही मूळ लेखक असाल आणि तुम्हाला योग्य श्रेय दिलेले नाही असे वाटत असेल किंवा तुम्हाला ती काढून टाकायची असेल, तर कृपया आमच्याशी त्वरित संपर्क साधा. सर्व कवींच्या हक्कांचा आणि योगदानाचा आदर करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.

वाचकांना कवितेचे मूळ स्त्रोत शोधण्यासाठी आणि कवितेबद्दल अधिक माहिती मिळविण्यासाठी प्रोत्साहित केले जाते.

मराठी कवितेचे वैविध्यपूर्ण जग समजून घेतल्याबद्दल आणि त्याचे कौतुक केल्याबद्दल धन्यवाद.